सरपंच महिलेसह मुलाला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा
शिरपूर : शेतात गाय, वासरू शिरल्याच्या कारणावरून सरपंच महिलेसह मुलाला मारहाण करणार्या दाम्पत्यावर थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनपूर (ता. शिरपूर) येथील सरपंच सरला पांडुरंग धनगर (वय 56) यांच्या फिर्यादीनुसार, वरील कारणावरून त्यांच्यासह मुलाला निलेश दिलीप धनगर व मिराबाई दिलीप धनगर (रा. असली, ता. शिरपूर) यांनी शिवीगाळ केली. निलेश याने काठीने बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
शेतकऱ्याच्या घरातून 29 हजाराचा ऐवज चोरला
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मंदाणे येथील भबुता संपत माळी या शेतकर्याच्या घरात चोरी झाली.
5 डिसेंबर रोजी रात्री दहा ते 6 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील 15 हजारांची रोकड, 14 हजार 350 रूपये किंमतीच्या 70 भार वजनाचे हातातील चांदीचे कडे असा एकुण 29 हजार 350 रूपयांचा ऐवज चोरून नेला. माळी यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस नाईक अभय गवते करीत आहेत.
सासुला मारहाण करणाऱ्या सुनेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : घरागुती भांडणावरून सासुला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सुनेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शालिनी दिलिप साळवे (वय 55, रा. प्लॉट नं. 14, सिंचय कॉलनी, वलवाडी, चावरा हायस्कूलजवळ, देवपूर) या महिलेने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घरगुती भांडणाच्या कारणावरून 9 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुन माधुरी प्रविण साळवे, माधुरीची आई, मोठी बहिण, पाहुणे, दोन भाऊ सर्व (रा. साक्री रोड, धुळे) यांनी घरात घुसून हाताबुक्यांनी मारहाण केली. तर माधुरीचे पाहुणे याने शालिनी साळवे यांचे डोके भितींवर आपटले. तसेच शिवीगाळ करीत धमकी दिली. वरील संशयितांविरूध्द गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल एम. बी. पाटील करीत आहेत.
नाशिकच्या तरूणाचा धुळ्याच्या हॉटेलमध्ये नग्नावस्थेत मृतदेह
धुळे : नाशिक येथील तरूणाचा शहरातील देवपूर भागातील एका हॉटेलच्या खोलीत नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला.अमेय नंदकिशोर वैद्य (वय 35, रा. योगेश्वर कॉलनी, हॉटेल सूर्यामागे, इंदिरानगर, सिडको, नाशिक) असे त्याचे नाव आहे. तो 12 डिसेंबर रोजी देवपूरातील नगावबारी चौफुलीवरील एका महागड्या हॉटेलमध्ये ऑनलाईन बुकींग करुन आला होता. रूम नं. 407 या ठिकाणी तो थांबला होता. सायंकाळी सात वाजता तो रूममधून खाली आला. यानंतर त्याच्या मित्रांसोबत तो जवळील रेस्टॉरंटमध्ये गेला. रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी त्याने जेवणाचे बिल दिले. यानंतर तो खोलीत गेला.
परंतु काल 13 डिसेंबर रोजी तो पुन्हा खाली आला नाही. याचवेळी त्याचा मित्र विजय मगर याचा हॉटेलवर फोन आला. अमेय फोन उचलत नसल्यामुळे तुम्ही रूमध्ये जावून त्याला फोन करायला सांगा, असे सांगितले. त्यानंतर हॉटेलमधील वेटर मंजीत व इतरांनी आवाज देऊनही खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलवले. दार उघडून पाहिल्यावर अमेय हा नग्नावस्थेत मृत आढळून आला. त्याच्या पाठीमागील भाग लालसर, हाताची नखे काळसर व निळी पडली होती. त्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नाही. याप्रकरणी देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल मोराणीस करीत आहेत.
भरधाव कारच्या धडकेत तरूण ठार
धुळे : तालुक्यातील गोंदूर-मोराणे रोडवरील पोल्ट्री फार्मनजीक भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला.
राकेश प्रमोद सूर्यवंशी (वय 34, रा. वाडीभोकर, गोंदूर रोड, मराठी शाळेजवळ, देवपूर, धुळे) असे त्याचे नाव आहे. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास एम. एच. 18 ए. के. 6441 क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. गोंदूर-मोराणे रोडवर मागून भरधाव येणार्या एम. एच. 39 जे. 2882 क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून राकेशचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला.
याबाबत सतिष प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिसात कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.
रेल्वे अपघातात युवक ठार
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथे रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू झाला. अजय संजय सोनवणे (वय 18, रा.वरूळ घुसरे, ता. शिंदखेडा) असे त्याचे नाव आहे. तो 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बकर्या चारण्यासाठी गेला होता. रेल्वे रूळाच्या बाजुला जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
धुळे : शहरातील मिल परिसरातील जय मल्हारनगरात प्रशांत गोरख वाघ (वय 37) या तरूणाने स्कार्पने गळफास घेत आत्महत्या केली. 13 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शहर पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास हेड काॅन्स्टेबल मोरे करीत आहेत.