जामफळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतांमध्ये, पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
शिंदखेडा : जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना शेतीसाठी थेट पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणार्या ’बंदिस्त पाईप वितरण प्रणाली’ (PDN) योजनेच्या कामाचे भूमिपूजन 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. हा कार्यक्रम जामफळ धरणावर होणार असल्याची माहिती या योजनेचे शिल्पकार आमदार जयकुमार रावल यांनी दिली.
या योजनेसाठी एक हजार 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच यावेळी शेतकरी शिव संवाद विकास यात्रेचा समारोप होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अरिशभाई पटेल, आमदार काशिरा पावरा उपस्थित राहणार आहेत.
सुमारे 2300 कोटी रुपये खर्चाच्या सुलवाडे-जामफळ उपसासिंचन योजनेचे काम मोठ्या गतीत सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तापी नदीचे पाणी जामफळ धरणात वळवून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांमधील शेतापर्यंत पाणी पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी जामफळ धरणातून 728 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाइपलाईनचे जाळे शिंदखेडा तालुक्यात पसरविण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे थेट शेतापर्यंत पाणी जाईल. यामुळे सुमारे 42 हजार 513 हेक्टर जमीन वर्षभरात सिंचनाखाली येणार आहे. तसेच शेतकर्यांना सिंचन व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी 92 पाणी वाटप संस्था सुरू करण्यात येतील. त्या संस्था इमारतींचे बांधकामही या
योजनेत करण्यात येणार आहे.
या 54 गावातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ : पिंपरखेडा, सारवे, बाभळे, वाघाडी, कलमाडी, गोराणे, वाघोदे, माळीच, मलाने, नरडाणे, जातोडे, वारुड, वर्षी, वाडी, विकवेल, वाघाडी ब्रु., वाघाडी खु., वायपूर, चांदगड, खलाणे, दलवाडे, दराणे, निशाने, महालपूर, बाभुळदे, कदाने, चिरणे, होळ, धांधरणे, डाबली, विटाई, पिपराड, गव्हाणे, शिराळे, बेटावद, भिलाने, दिगर, पाष्टे, मुडावद, वघोदे, म्हळसर, हुंबरडे, वडली, कमखेडा, अंजदे, दत्ताने, तावखेडा, सुकवद, निरगुडी, सुलवाडे, टेंभलाय, दसवेल, शिंदखेडा, पाटण या 54 गावांतील शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.















