Shekhar Kulkarni as National Senior Citizen Helpline Volunteer
राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईन स्वयंसेवकपदी शेखर कुळकर्णी

Dhule News धुळे : ज्येष्ठ नागरीकांना विविध प्रकारच्या सेवा, सुविधा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईनसाठी धुळे जिल्ह्याचे स्वयंसेवकपदी सामाजिक कार्यकर्ते शेखर सखाराम कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते असून समाज, राजकारण, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
ज्येष्ठ नागरीकांची राष्ट्रीय हेल्पलाईन सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे.
देशातील ज्येष्ठ नागरीकांच्या विविध समस्या साेडविण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयाेग हाेणार आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग तसेच जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविली जाणार आहे. राज्यात १४५६७ या क्रमांकावर ही हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी धुळे जिल्ह्यात स्वयंसेवकपदावर शेखर कुळकर्णी यांची नियुक्ती जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली.
ते गेल्या २५ ते ३० वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ब्राह्मण समाजात काेणाकडे मृत्यु झाल्यास अंत्यविधीसाठी तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मण अंत्येष्टी सेवा उपक्रम राबविला जाताे. याशिवाय घासकडबी शैक्षणिक संस्थेत ते संचालक असून धार्मिक, सामाजिक कार्यासह राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग असताे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या निवडीचे ब्राह्मण समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महापाैर प्रतिभा चाैधरी, माजी उपमहापाैर भगवान गवळी, भाजपचे जिल्हाप्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापाैर प्रदीप कर्पे यांच्यासह इतरांकडून स्वागत करण्यात आले आहे.














