शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल
शिरपूर (प्रतिनिधी) :- शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आज फार्मसी कॉलेजमध्ये भाजपचा संकल्प मेळावा झाला. मेळाव्यानंतर प्रचंड शक्तीप्रदर्शनाने माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि युवा नेते तथा माजी नगरसेवक चिंतनभाई पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत प्रचारात आघाडी घेतली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राम भदाणे, बबनराव चौधरी, डॉ. तुषार रंधे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, देवेंद्र पाटील, के. डी. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की, शिरपूर शहर आणि शिरपूर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता विकासाची गंगोत्री आणली. शेतीच्या विकासासाठी शिरपूर तालुक्यामध्ये साडेचारशे लहान मोठे डॅम बनवून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला जमिनीची पाणी पातळी वाढल्यामुळे जमिनी बागायती झाल्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शिरपूर शहरालाही मिनरल वॉटरचा मुबलक पुरवठा होत आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासह शिक्षण, आरोग्य आणि तरुणांना रोजगार हे प्रश्न देखील मार्गी लावले. गेल्या 30-40 वर्षांपासून विकास कामे करीत शिरपूर शहर आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये शिरपूरचा क्रमांक लागतो. त्यामुळे या निवडणुकीत शिरपूरचे मतदार विकासालाच मतदान करतील, असा आत्मविश्वास आमदार अमरीशभाईंनी व्यक्त केला.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की धुळे जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधीपासूनच भारतीय जनता पार्टीचे बहुमत आहे. जनता आमच्या पाठीशी आहेच. त्यामुळे मी तुमच्याकडे बहुमत मागण्यासाठी आलो नाही तर शतप्रतिशत भाजपची सत्ता यावी असे आवाहन करण्यासाठी आलो आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आणि पिंपळनेर या चारही नगरपालिकांवर सर्वच्या सर्व भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी भाजपासाठी निवडणुकीत वातावरण निर्मिती केली.












