संघर्षाचे सोने करणाऱ्या दीपस्तंभाचा ‘अमृताचा’ प्रवास
वय वर्षे ७५… म्हणजेच आयुष्याचे पाऊण शतक! हा काळ केवळ कॅलेंडरची पाने उलटण्याचा नसतो, तर तो असतो कष्टाने पेरलेल्या समाधानाचा, संघर्षातून कमावलेल्या यशाचा आणि राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्यातून मिळविलेल्या अथांग आदराचा. धुळे शहराच्या विविध क्षेत्रांतील एक आधारस्तंभ, दीपस्तंभ, आदरणीय ओमप्रकाशजी पुरणमलजी अग्रवाल उपाख्य सर्वांचे लाडके ‘ओपी शेट’ आज वयाची ७५ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या या दिशादर्शक आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा
– संजय पि. पाटील, पीआरओ, आमदार अनुपभैया अग्रवाल, धुळे

काही माणसे स्वतःसाठी आयुष्य जगतात, तर काही माणसे आपल्या कुटुंबासाठी जगतात. मात्र, अशी काही माणसे असतात, की त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा नकळत अनेकांच्या आयुष्याला दिशा देतो. समुद्रकिनाऱ्यावरचा दीपस्तंभ जसा त्याच्या प्रकाशामुळे अनेक जहाजांना दिशा व मार्ग दाखवतो, तसेच ओमप्रकाशजी पुरणमलजी अग्रवाल उपाख्य ओपी शेट हे असेच एक दीपस्तंभासारखे दिशादर्शक व्यक्तिमत्त्व. ओपी शेट यांची आजची ओळख यशस्वी उद्योजक अशी असली, तरी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांशी त्यांची वीण घट्ट जुळली आहे. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकता या गोष्टींचा मेळ जुळवत दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या अंगभूत त्रिगुणांच्या बळावर जनमानसांत कार्याचा अमीट ठसा उमटिवला. श्री. ओमप्रकाशजींच्या गेल्या ७५ वर्षांच्या जीवनातील वाटचालीचा आढावा घेतला, तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देताना त्यांचा साधी राहणी… शिस्तबद्ध जीवन, प्रामाणिकपणा… धर्म आणि संस्कृतीवरील अढळ श्रद्धा, व्यवसायातील दूरदृष्टी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसे जोडण्याची विलक्षण ताकद हे गुण महत्त्वाचे ठरतात.

संघ संस्कार आणि ध्येयवादी जडणघडण : आज ओपी शेट यांच्या रूपाने यशस्वी आणि प्रगल्भ नेतृत्वाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, या यशाची पायाभरणी अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. त्यांचे पिता (कै.) पुरणमलजी आणि माता (कै.) गीतादेवी अग्रवाल यांनी राजस्थानमधील आपले सिंगनोर गाव सोडून धुळे गाठले तेव्हा त्यांच्यासमोर संघर्षाचा डोंगर होता. सुरवातीला नोकरी आणि नंतर कापड व्यवसायाची उभारणी करताना त्यांच्या वडिलांनी घेतलेले कष्ट ओमप्रकाशजींनी अगदी जवळून पाहिले. वडिलांचे कष्ट आणि आईचे संस्कार हीच ओपी शेट यांच्या आयुष्याची खरी शिदोरी ठरली. धुळे नगरपालिकेच्या शाळेत शिकतानाच, मनोहर चित्रमंदिराशेजारील मोकळ्या पटांगणात भरणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ओपी शेट यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. शाखेतील खेळ, देशप्रेमाची गाणी आणि संस्कारांनी त्यांच्या बालमनात राष्ट्रभक्तीचे बीज रोवले. मदनलालजी मिश्रा आणि बापट सरांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरले, तर पुढे चालून दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा मिळाली. अखंडित, सुसंघटित आणि परमवैभवशाली हिंदू राष्ट्र घडवण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आजही त्यांच्या कार्यातून जिवंत आहे.

संघर्षातून उभारलेले साम्राज्य : ओपी शेट यांच्या यशाची पाळेमुळे त्यांच्या जीवनसंघर्षात आहेत. त्यांच्यातील अफाट संघटन कौशल्य आणि वक्तृत्वाची पहिली चुणूक महाविद्यालयीन जीवनात दिसली. धुळ्यातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत ‘जनरल सेक्रेटरीपद’ पटकावले. हा विजय म्हणजे भविष्यातील एका मोठ्या लोकनेत्याच्या उदयाची नांदी ठरली. `उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ धुळ्यास मिळावे म्हणून त्यांनी अनेक आंदोलने उभारली. काँग्रेसच्या राजवटीत धुळ्याची ताकद कमी पडली म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला देण्याचा निर्णय झाला. कारण त्या काळात शिक्षणमंत्री म्हणून शरचंद्रिका अक्का आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मधुकरराव चौधरी यांचा राज्याच्या राजकारणात वरचष्मा होता. तरीही ओमप्रकाशजींच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने धुळे जिल्ह्याला `वैद्यकीय महाविद्यालय’ देण्याचा निर्णय घेतला.

शिक्षणानंतर व्यवसायाकडे लक्ष : शिक्षणानंतर ओमप्रकाशजींनी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. दुकानामुळे त्यांचा सामान्य जनतेशी संपर्क वाढला. व्यवसायानिमित्त त्यांना अनेकदा अखंडित धुळे जिल्ह्यात दुचाकीवर फिरावे लागे. त्यांनी संपूर्ण खान्देशाची अनेकदा भटकंती केल्याने जनसंपर्क अफाट वाढला. व्यवसायामुळे खान्देशभर फिरताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार केला. अनेक नेते त्यांच्या सोबत दुचाकीवर उत्तर महाराष्ट्राची भ्रमंती करत. संघटनेच्या आंदोलनांत सहभाग आणि संघाचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामामुळे ओमप्रकाशजींवर भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह विविध पदांची जबाबदारी आली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शिवणकर, प्रवीण तोगडिया, पांडुरंग फुंडकर, गोविंदराव चौधरी, डॉ. दौलतराव आहेर, उमा भारती आदी नेत्यांशी त्यांचे संबंध घट्ट झाले. माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांच्याशी तर खास मैत्री होती. ओमप्रकाशजींची राजकारणातील सक्रियता वाढत असताना अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, नरेंद्र मोदी यांच्याशीही ते संपर्कात आले. विविध आंदोलनांत सक्रीय सहभाग घेतला म्हणून प्रसंगी त्यांनी तुरुंगवासही पत्करला आणि संघटन उभारणीचे कार्य सातत्याने पुढे नेले. याच काळात व्यवसायात पुन्हा अपयश आले. परंतु, खचून न जाता १९८९ मध्ये त्यांनी प्रदीर्घ अनुभव, प्रचंड जनसंपर्काच्या बळावर व्यवसाय पुन्हा एकदा भरभराटीला आणला.

अनेक उद्योगांची रोवली मुहूर्तमेढ : व्यवसाय आणि राजकारणाची सांगड घालत त्यांनी आपले कुटुंबही उत्तमरीत्या सावरले. एकसंधतेची ताकद बालवयातच मनावर बिंबविल्यामुळे संपूर्ण कुटुंब आजही एकजुटीने राहते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यसंख्या आज तीनशेवर पोहोचली आहे. ओमप्रकाशजींनी अनेकविध व्यवसाय यशस्वीपणे सुरू केले. यामध्ये टॉपलाइन रिसॉर्ट, सोयावडी उत्पादन, अन्नधान्य, तेलबिया, डाळींचे उत्पादन, कोल्ड स्टोअरेज व्यवसाय आदींचा समावेश आहे. पक्षाच्या आदेशानुसार लढविलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या धर्मपत्नी विमलादेवी दोन वेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या, तर त्यांचे सुपुत्र अनुपभैया अग्रवाल सध्या धुळे शहराचे आमदार आहेत.

समाजकार्यातून आदर्शवत काम : ओमप्रकाशजी अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. समाजातील अडल्या-नडल्यांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात. गरजूंना त्यांच्या पायावर उभे करण्यासह उद्योग-व्यवसाय सुरू करता यावेत म्हणून त्यांनी श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था उभारली. गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देणारी आश्रमशाळाही सुरू केली. धुळे जिल्हा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, अग्रवाल संमेलनाचे प्रदेश संघटनमंत्री, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष, श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रियदर्शिनी जिमखान्याचे कोशाध्यक्ष, श्री रामकृष्ण सेवा समितीचे विश्वस्त, खान्देश गोशाळेचे सेक्रेटरी आदी विविध संस्था-संघटनांचे ते आजही आश्रयदाते म्हणून कार्यरत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात श्री रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातून विविध पदांवर काम करताना ओपी शेट यांनी भाविकांसाठी धुळे शहरासह वृंदावन, ऋषिकेश आदी ठिकाणी संतश्री किशोरजी व्यास, श्री डोंगरेजी महाराज, श्री मुरारीजी बापू, भाईश्री रमेशजी ओझा, प्रदीपजी मिश्रा आदी संत-महंतांच्या प्रवचनांसह कथांचे आयोजन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना `अग्रविभूषण’, `अग्रश्री’ आणि `खान्देश श्री’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

उद्योग- समाज-राजकारणाचा त्रिवेणी संगम : ओपी शेट यांनी केवळ व्यवसायातच यश मिळवले नाही, तर समाजकारण, धर्मकारण, राजकारण, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांत कार्याची घट्ट वीण गुंफली. त्यांचे जीवन म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकतेचा उत्तम मेळ आहे. रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातून वडिलांनी सुरू केलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. राजकारण किंवा समाजकारणात पद महत्त्वाचे नसते, तर तुमची कर्तबगारी आणि माणसांशी असलेली नाळ महत्त्वाची असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. ओपी शेट यांचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे, त्यांनी कधीही केवळ स्वतःची प्रगती पाहिली नाही. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक सामान्य माणूस, कार्यकर्ता किंवा तरुण आज कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालेला दिसतो. म्हणूनच ते अनेकांसाठी केवळ मार्गदर्शक नसून, संकटात आधार देणारे दीपस्तंभ ठरतात.

अजातशत्रू, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व
धावपळीच्या व व्यस्त जीवनातही आरोग्याचे सातत्य टिकविण्यासाठी आजही ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून प्राणायाम आणि योगासने करतात. मुलगा आमदार अनुप अग्रवाल आणि नातू चिरायू यांच्याशी चर्चा करून दिवसभरातील कामांचे नियोजन करतात. कठोर परिश्रम, सातत्य, प्रामाणिकता आणि चेहऱ्यावर नेहमीच असणारे आश्वासक हास्य ही ओपी शेट यांची खरी ओळख आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण करतानाही त्यांचा उत्साह आणि समाजाप्रती असणारी तळमळ तरुणांना लाजवणारी आहे. आज अमृतमहोत्सवाच्या या सुवर्णक्षणी, ओपी शेट यांच्या पाठीशी त्यांचा अफाट मित्रपरिवार, स्नेही, कार्यकर्ते आणि त्यांनी कमावलेले अलोट लोकप्रेम उभे आहे. अशा या दिशादर्शक, मार्गदर्शक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
















Comments 1